सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे बालदिन

न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 14, 2025 17:28 PM
views 70  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गतर्फे बालदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग एस. एस. इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सौ. संपूर्णा गुंडेवाडी, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा चव्हाण, सहशिक्षिका सौ. सदिच्छा कसालकर, सौ. रिदिमा पालव, सौ. प्रियांका डफळे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  सुनील जाधव, सदस्य शसुशिल निब्रे, सदस्या सौ. श्रद्धा जाधव, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सौ. श्वेता सावंत (लिपिक) उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मा. संपूर्णा गुंडेवाडी यांनी बालदिनाचे महत्व उलगडून सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांविषयी असलेल्या अपार प्रेमामुळे त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाते, तसेच “आजची मुले ही उद्याचा भारत आहेत,” या विचारातून मुलांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुलांनी जीवनात कसे वागावे, कशाप्रकारे संस्कार आत्मसात करावेत याबाबतही त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनीही मुलांना बालदिनानिमित्त मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास व सकारात्मक विचारांची ज्योत पेटवली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘चाचा नेहरू’ यांच्यावर मराठी व इंग्रजीतील प्रभावी भाषणे सादर केली. तसेच त्यांच्या अंगी दडलेल्या विविध कला – गाणी, नृत्य, वक्तृत्व इत्यादींचे मनमोहक सादरीकरणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सदिच्छा कसालकर यांनी केले तर मुख्याध्यापिका सौ. अनुजा चव्हाण यांनी प्रास्ताविक करून बालदिनाचे औचित्य स्पष्ट केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेला हा उपक्रम मुलांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.