
बांबुळी : 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'च्या माध्यमातून गावामध्ये विकासाची चळवळ उभी करून स्पर्धेत क्रमांक मिळवण्याचे आवाहन बांबुळीचे सरपंच प्रशांत परब यांनी केले. बांबुळी ग्रामपंचायतीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता बांबुळी प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत ते बोलत होते.
या सभेला पंचायत समिती, कुडाळचे गटविकास अधिकारी (वर्ग १) प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी धन्रे, आरोग्य विभागाच्या चेंदवणकर, विलास गोसावी, आरोग्य सेवक संकेत निकम, उमेद प्रभाग समन्वयक प्रसाद ठाकूर, तसेच सामाजिक कार्यकर्ते व भगीरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर, पंचायत समितीचे माजी सभापती अभय परब, ग्राम महसूल अधिकारी कोरगावकर, ग्रामविकास अधिकारी कु. पी. बी. रूपवते, सरपंच प्रशांत परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला गावातील अल्पायुषी, वयोवृद्ध आणि अपघाती निधनामुळे दुःखद निधन झालेल्या व्यक्तींना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष बांबुळकर यांनी केले, तर प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी कु. पी. बी. रूपवते यांनी केले.
अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन
गटविकास अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर यांनी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत गावाचा विकास कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरित गाव, मनरेगा आणि इतर योजनांचा वापर करून गावाचा विकास साधण्यावर भर दिला.
ग्राम महसूल अधिकारी सौ. कोरगावकर यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार गावातील रस्ते, पायवाटा आणि पाणंद रस्ते रुंदीकरण करून त्यांची सातबारा उताऱ्यावर अधिकृत नोंद कशी करावी, याबाबत माहिती दिली.
डॉ. प्रसाद देवधर यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, सेंद्रिय शेती, गांडूळ खत यांसारखे व्यवसाय तसेच बाह्य संस्थेच्या सीएसआर निधीचा वापर करून विकास कसा साधता येईल, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
श्री. प्रसाद ठाकूर यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने'तून ३५% सबसिडीवर महिलांना खाद्यपदार्थ, फळप्रक्रिया, मसाला उद्योग सुरू करता येतात, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचा उपक्रम
यावेळी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचतगटांना कुक्कुटपालनासाठी पक्षी वाटप करण्यात आले. यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबरपासून झाली असून, ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने, सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.