मुख्यमंत्री पंचायत राज अभियान ; वेंगुर्लेत कार्यशाळा

Edited by: दिपेश परब
Published on: September 13, 2025 19:33 PM
views 110  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कार्यशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना चालू आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्यस्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पंचायत अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.

यावेळी सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी संतोष गोसावी, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे, सरपंच प्रतिनिधी म्हणून अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, कृषी विस्तार अधिकारी सखाराम सावंत, सुप्रिया कोरगावकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कृषी अधिकारी निलेश जाधव, यांच्या सहित तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पंचायत अधिकारी, ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून संपूर्ण अभियानाची माहिती दिली.

संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राज्यस्तर/ विभाग स्तर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत परुळेबाजार तसेच स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत केळुस, ग्रामपंचायत पालकरवाडी, ग्रामपंचायत परबवाडा या ग्रामपंचायतीचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.