
सावंतवाडी : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाच्यावतीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व पुरस्कार' सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सावंतवाडी तालुक्यामतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य स्तरावर २.४३ कोटी रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. हे अभियान १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवले जाईल. संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
या अभियानात 'सुशासनयुक्त पंचायत', 'सक्षम पंचायत', 'जलसमृद्ध हरित गाव निर्माण करणे', 'मनरेगा', आणि इतर योजनांचे प्रभावी अंमलबजावणी, 'गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण', 'उपजीविका विकास', 'सामाजिक न्याय', 'लोकसहभाग' आणि 'श्रमदान' यांसारख्या बाबींचा समावेश आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पार पडणाऱ्या कार्याशाळेत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे.










