सिंधुदुर्गवासियांना गोव्यात खासगी रुग्णालयातही महात्मा फुले योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचं आश्वासन
Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 18:36 PM
views 104  views

सावंतवाडी : म्हादई नदी प्रश्नावर गोवा सरकार सक्षम आहे त्यामुळे म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल असा दावा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केला. मात्र महाराष्ट्राने ही आम्हाला याबाबतीत सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. तर सिंधुदुर्गातील आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता गोवा मेडिकल कॉलेज पाठोपाठ आता गोव्यातील अन्य खाजगी रुग्णालयातही महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ सिंधुदुर्गातील जनतेला मिळण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. याबाबत लवकरच पावले उचलण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील श्री देवी भावईचे आणि कुलस्वामिनी भवानी देवीच दर्शन आणि येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत येथे आले होते. यावेळी त्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राजन तेली उपस्थित होते.


डॉ.सावंत म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढवण्यासाठी येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घेण्यासाठी आणि योगायोगाने कुणकेरी येथील श्रीदेवीचे दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध गेले कित्येक वर्षापासून घट्ट आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराचा आणि पर्यटन दृष्ट्या विचार करता काम करणे गरजेचे आहे. रोजगाराचा विचार करता सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन येतील युवकांसाठी बॉर्डर परिषद घेणे गरजेचे आहे. तसेच मोपा विमानतळाचा पर्यटनाच्या दृष्टीने कितपत फायदा होईल यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नावर गोवा राज्याकडून नेहमी सहकार्याची भूमिका राहिली आहे. यापुढेही ही भूमिका राहणार असून मेडिकल कॉलेज आता गोव्यातील खाजगी रुग्णालयातही महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्गातील अनेक रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर यासाठी पावले उचलण्यात येतील.

श्री सावंत पुढे म्हणाले, गोव्याच्या म्हादई नदी प्रश्नावर गोव्या सरकारची कायदेशीर टीम काम करत आहे. त्यामुळे ही लढाई गोवा निश्चितच जिंकणार अशी खात्री आहे. परंतु या प्रश्नावर महाराष्ट्र राज्यानेही सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. देशातील पाच राज्यांमध्ये  जनसभा निवडणूक होत आहे. यातील चार राज्यात आपण स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. पाच पैकी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलणार आहे. तर अन्य दोन राज्यात भाजप विरोधकांना काटे की टक्कर देणार आहे. महाराष्ट्र राज्यातही येणाऱ्या काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ फुलण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार.

यावेळी प्रथमच कार्यालयात आलेल्या मुख्यमंत्री श्री सावंत यांचे राजन तेली यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, मनोज नाईक माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर आनंद निवगी माजी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर भालेकर आनंद नेवगी केतन आजगावकर गुरु मठकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.