
कुडाळ : महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्ख्या देशाची अस्मिता असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक एक वर्ष पूर्ण ही झाले नाही. आज ते बांधकाम कोसळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जो अपमान झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सर्व छत्रपती प्रेमींचा अपमान असून घाईगडबडीत या स्मारकाच्या भव्यदिव्य उद्घाटनप्रसंगी चमकोगिरी करण्यासाठी शासकिय निधीचा करोडो रुपयांचा चुराडा करून इव्हेंट करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतोय, अशी भूमिका असे सिंधुदुर्ग जिल्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतली.
या स्मारकाच्या दुर्दैवी घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे,मग ती कोणीही आणि कितीही मोठ्या पदावर वा अधिकारावर असलीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेपुढे मोठे नाहीत, देशात आणि राज्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेचा उपभोग घेत आहेत त्यांना जरा जरी नितीमत्ता असेल तर त्यांनी या स्मारकाच्या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करून आपण खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहोत हे महाराष्ट्रासह देशातील शिव भक्तांना दाखवून देण्याची हिंमत दाखवावी,असे आव्हान त्यांनी दिलं.