राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचे अवशेष पोलीस बंदोबस्तात केले बाजूला

नव्याने पुतळा उभारण्यात येणार ; जतन करून ठेवले जातील अवशेष
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 17, 2024 19:30 PM
views 139  views

मालवण : मालवण - राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्याने पुतळा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष हलविण्यास सुरुवात केली  आली आहे. शासनाचे पुढील आदेश होई पर्यंत हे अवशेष जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष बाजूला करण्याच्या कामाला सुरुवात झाली.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता चार महिन्यानंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा असल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फुट इतकी असणार आहे. तर पुतळा पेलण्यासाठी ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर कंत्राटदार कंपनीने १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घातली आहे. आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल. आधीच्या पुतळ्याला कला संचलनालयाची मान्यता घेतली गेली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. 


आज पोलीस बंदोबस्तात हे अवशेष हलविण्यात आले. यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, अजित पाटील पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह अन्य उपस्थित होते.