सावंतवाडीत 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर'

Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2026 20:41 PM
views 45  views

सावंतवाडी : शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनतेच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व उपविभागीय अधिकारी समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या मोहिमेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.


तालुक्यातील सर्व ८ महसूल मंडळांमध्ये हे शिबिर पार पडणार आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरांमध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील तसेच विविध दाखले व योजनांच्या लाभासाठी अर्ज करता येणार आहे. बांदा येथे ७ मार्च, आजगाव १४ मार्च, क्षेत्रफळ २५ मार्च, आंबोली १० एप्रिल, मडुरा १७ एप्रिल, निरवडे २४ एप्रिल, सावंतवाडी ८ मे, माडखोल १५ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या समाधान शिबीरातंर्गत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क,लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, सुधारणा व नागरी सुविधा आदी सेवा  शिबीरातंर्गत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची ही सुवर्णसंधी असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलं आहे.