
सावंतवाडी : ज्येष्ठ नेते, विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात भव्य बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित असुन सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमधील 21 वर्षाखालील मुलांना आणि मुलींना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
रविवार दि. 22 जून रोजी सकाळी 9:30 विकास सावंत यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहे. भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार स्विस लीग राउंड पदधतीने स्पर्धा एकत्रित खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे राउंड स्पर्धेवेळी जाहीर करण्यात येतील. चार गटात चौदा बक्षिसे आणि विशेष दोन बक्षिसे अशी एकूण सोळा बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही फी घेण्यात येणार नाही. नामदार भाईसाहेब सेवा प्रतिष्ठानतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.