BIG BREAKING | सिंधुदुर्गात पोलीस भरतीत बनावट दाखले जोडून फसवणूक

पोलिसांची कारवाई
Edited by: संदीप देसाई
Published on: May 31, 2023 20:12 PM
views 131  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल शिपाई भरतीत चक्क बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार लातूर आणि बीड जिल्ह्यातील दोघांवर व त्यांना मदत करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( रा. जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले (रा. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर) अशी या फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सिंधुदुर्ग पोलीस भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला त्यांनी जोडला होता. हे दोघे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षण निहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते. या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे या पडताळणीत सिद्ध झाले आहे.

त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह विविध कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.