
सावंतवाडी : चौकुळ गावाला अनेक वर्षे भेडसावणारा कबुलायतदार-गावकर प्रश्न सोडवण्यासंदर्भात शासन अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशाबाबत माहिती देण्यासाठी सावंतवाडी येथे चौकुळ ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासन निर्णय स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला.
‘गावकर’ आणि एकत्र सातबारा पद्धती कायम ठेवून जमीन वाटपास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल ६५ प्रमुख लोकांची समिती गठीत करण्यात आली. त्या माध्यमातून २३४३ हेक्टर खाजगी वन असलेली जमीन आणि ४७९७ हेक्टर कबुलायतदार गावकर म्हणून असलेली जमीन कुटुंब निश्चिती करून सम प्रमाणात वाटप करण्यात येईल, असे जाहीर केले. या अध्यादेशाचे पत्र गावातील प्रमुख मानकऱ्यांना प्रदान केले. या निर्णयाबद्दल चौकुळ ग्रामस्थांनी जल्लोष करीत शासनाचे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सीईओ देशमुख, भरत गावडे, दिनेश गावडे, समिती सदस्यांपैकी सोनू गावडे, विठ्ठल गावडे, भिकाजी गावडे, बापू गावडे, वासुदेव गावडे, तुकाराम गावडे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.