चराठे - पंचशीलनगर रस्त्याची युवकांकडून श्रमदानाने डागडुजी

Edited by:
Published on: April 19, 2024 12:15 PM
views 203  views

सावंतवाडी ः चराठे-पंचशीलनगर येथे ग्रामपंचायत समोरून जाणाऱ्या रस्त्याचे बरेच दिवस घोंगडे भिजत पडले होते.  कित्येकदा प्रशासनाकडे मागणी तसेच आंदोलने करूनही या रस्त्याची डागडुजी अद्यापही या उदासीन प्रशासनाला करता आलेली नाही. या प्रशासनाची वाट न पाहता येथील युवक या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सरसावले आणि त्यांनी स्वखर्चाने या रस्त्याची डागडुजी केली आहे. आता या रस्त्याचा उपयोग पंचशीलनगरमधील ग्रामस्थांसाठी होत आहे. याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.

चराठे-पंचशीलनगर येथील नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन आणि आडमुठ्या धोरणामुळे कित्येक वर्षे रस्ता डागडुजी न केल्यामुळे येथील ग्रामस्थांना खूप त्रास होत होता. येथील सर्व युवकांनी एकत्र येऊन  स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली. या युवकांनी हा रस्ता तात्पुरता  रहदारीसाठी योग्य बनवला आहे. 

या श्रमदानात महेश जाधव, शरद जाधव, संदीप चराठकर, विकास कांबळे आणि बाल उत्कर्ष मंडळाचे सर्व युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.  रस्त्याची डागडुजी करून रस्ता रहदारीस योग्य बनवल्याने वाडीवरील तसेच नमसवाडी येथील नागरिकांची सोय झाली असून, त्याबद्दल सर्वांनी  समाधान व्यक्त केले आहे.