चराठ्याचं पाणी पेटलं

प्रश्न सोडवणार कोण ? ग्रा.पं.त ग्रामस्थ पाजणार 'पाणी' !
Edited by: विनायक गावस
Published on: December 12, 2022 21:10 PM
views 388  views

सावंतवाडी : चराठा गावची वाडी सावंतवाडी. मात्र, या शहरालगत असणाऱ्या चराठा गावातील पाणी प्रश्न जटील बनला आहे. एकीकडे २० वर्ष बिनकामी असणारी विहीर आपली व्यथा मांडत आहे. तर दुसरीकडे चराठा चिवार टेकडी उभागुंडा येथील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ७५ हून अधिक घर या ठिकाणी राहत असून १५०-२०० हून अधिक येथील लोकसंख्या आहेत.  गेल्यावर्षी नगरपरिषदने बंद केलेल पाणी अद्याप सुरु न केल्यानं पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायतकडून तीन दिवसांतून एकदा पाणी सोडलं जातय. त्यातही कायमस्वरूपी पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांच घर या ठिकाणीच आहे. 

दरम्यान,मागली सत्ताधाऱ्यांकडून पाण्यासाठी अजून दीड वर्ष रडत भिक मागा असं सांगितल गेल अशी माहिती ग्रामस्थांनी कोकणसाद LIVE ला दिली. महिलांनी रोष व्यक्त करत आपली व्यथा कुणी ऐकून घेत नाही. निवडणूक आली की मतांसाठी जोगवा मागतात. परंतु, परिस्थिती जैसे थेच आहे असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला. या ठिकाणी प्रचारासाठी येणाऱ्या चराठा ग्रामपंचायतच्या उमेदवारांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी सर्वांनुमते घेतलाय. शहरालगत असणाऱ्या चराठा गावाचा पाणी प्रश्न सुटणार कधी ? अन् सोडवणार कोण? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत पाणी प्रश्न पेटला असून येत्या ग्रामपंचायतीत चराठे चिवार टेकडीतील मतदार कुणाला पाणी पाजणार हे देखील पहावं लागणार आहे.