कणकवलीत दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांनी दक्षता घेण्याच्या तहसीलदार आर. जे. पवार यांच्या सूचना
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 20, 2022 09:07 AM
views 360  views

कणकवली : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दिनांक १९ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजा चमकणे व ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर 'दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा तसेच तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७) २३२०२५ येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.