आठवडा बाजारादिवशी अपघात होण्याची शक्यता : अॅड. संदीप निंबाळकर

Edited by:
Published on: July 09, 2023 19:02 PM
views 109  views

सावंतवाडी : आठवडा बाजाराच्या नव्या जागेत असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात घडलेल्या पावसामुळे झाडांच्या काही फांद्या तुटून पडल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे.

दरम्यान, याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी केली असून त्या ठिकाणी असलेली धोकादायक झाडांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा, अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल असा त्यांनी इशारा दिला आहे.


मोती तलाव की होळीचा खुंट अशा वादात सापडलेला आठवडा बाजार अखेर गोदामाच्या परिसरात असलेल्या जागेत हलविण्यात आला व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्या ठिकाणची जागा सुस्थितीत करण्यात आली मात्र परिसरात असलेली जीर्ण व धोकादायक झाडे आणि शौचालयाचा प्रश्न आजही कायम आहे.हे प्रश्न लवकरच दूर करण्यात येतील असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, गेले काही दिवस सतत पाऊस सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्या तुटून पडत असल्याचे चित्र आहे त्यामुळे आठवडा बाजाराविषयी एखादी फांदी त्या ठिकाणी जमलेल्या व्यापारी किंवा गर्दीवर पडल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अँड. निंबाळकर यांनी केली आहे