
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या 'एमएनजीएल'च्या (MNGL) कामामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, आता चक्क कुडाळचे श्रद्धास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील जागेची दुर्दशा करण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या अगदी वळणावरच चार इंच उंच चेंबर बांधून अपघाताला खुले निमंत्रण देण्यात आले आहे. हे काम तातडीने न सुधारल्यास शहरात MNGL चे एकही काम होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तेरसे म्हणाल्या की, नगरपंचायतीच्या सौजन्याने MNGL चे काम सुरू आहे, परंतु या कामात कोणताही ताळमेळ नाही. राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील अतिशय रहदारीच्या आणि वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या चार इंच उंच चेंबर बांधण्यात आला आहे. यामुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर पायी चालणाऱ्या नागरिकांनाही अडखळून पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे काम म्हणजे निव्वळ विद्रुपीकरण असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
प्रशासनाचा वचक नाही
MNGL बाबत नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही शहरात कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासनाला नेमकी कुठे खोदाई केली जाते किंवा कुठे चेंबर बांधले जातात, याची काहीही माहिती नसते. नगरपंचायतीचा या कंत्राटदारांवर कोणताही वचक राहिला नसल्याने शहरात असे प्रकार घडत असल्याचा आरोप तेरसे यांनी केला आहे.
सदर धोकादायक चेंबर या जागेवरून दुसरीकडे हलवून, स्मारकासमोरील जागा आणि रस्ता उद्याच पूर्वीसारखा सुस्थितीत करावा. तसे न झाल्यास कुडाळ शहरात MNGL चे कोणतेही काम चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच, या बेजबाबदार कारभाराची रीतसर तक्रार मा. जिल्हाधिकारी तसेच मा. पालकमंत्री यांच्याकडे करण्यात येईल, असेही नगरसेविका संध्या तेरसे यांनी स्पष्ट केले आहे.










