
चिपळूण : प्रतिनिधी: चिपळूण नगर परिषद हद्दीतील नव्याने करण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबत आमदार मा. श्री. शेखर निकम हेही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात चिपळूण नगर परिषदेच्या हनुमान व्यायामशाळा इमारतीचे पुनर्निर्माण व व्यायामशाळा विकास योजना सन २०२४-२५ अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या अंतर्गत व्यायाम शाळेमध्ये साहित्य वसविणे आणि इमारतीच्या तळमजल्याचा लोकार्पण समाविष्ट आहे. हे काम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, इमारत तळमजला येथे पार पडणार आहे.
त्याचप्रमाणे, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या ई-चार्जिंग स्टेशनच्या कामाचाही लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळील ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक असून नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.