
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मालवण, बांदा आणि कुडाळ येथे झालेल्या काजू चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली असतानाच, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या चोरीचा तपास करताना पोलीस प्रशासन प्रामाणिक काजू उद्योजकांनाच 'गुन्हेगार' असल्यासारखी वागणूक देत असल्याचा आरोप करत, जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
मालवणमधील नामवंत काजू उद्योजक सुरेश नेरूरकर यांच्यासारख्या व्यक्तीला, ज्यांनी २५ वर्षे या उद्योगात योगदान दिले आहे आणि ज्यांचा गौरव खुद्द माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केला आहे, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. काजू उद्योगाला 'जी.आय.' नामांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उद्योजकाला अपमानास्पद वागणूक देणे हा संपूर्ण जिल्हा उद्योजक क्षेत्राचा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
'महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन' आणि 'कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडपीसे व पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
निवेदनातील मुख्य मुद्दे:
चोरीचा माल खरेदी केला या संशयावरून व्यापाऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ थांबवावा.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यांची तात्काळ चौकशी व्हावी.
पोलिसांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली असून, प्रशासनाने उद्योगासाठी आश्वासक वातावरण निर्माण करावे.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र काजू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर, कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव नाकुल पार्सेकर, सहसचिव कुणाल वरसकर, गणेश काजूचे मालक सुरेश नेरुरकर, अभिषेक नेरुरकर, रामगड सरपंच शुभम माठकर, एकनाथ तेली, तसेच जि.प. सदस्य अनिल कांदळगावकर, प्रमोद भोगटे, भाऊ राणे, उदय केसरकर, भाऊ वळंजू व इतर मान्यवर उपस्थित होते.










