
दोडामार्ग : कळणे सडा परिसरात पुन्हा एकदा काजूबागेला आग लावण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई व त्यांचे भाऊ नामदेव देऊ देसाई यांच्या जवळपास १ एकर क्षेत्रातील काजू बागेला भरदिवसा अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या आगीत मोहर येण्यास सुरुवात झालेली ३-४ वर्षांची काजूची कलमे व कुंपण पूर्णतः जळून खाक झाले आहे.
याच बागेत याच वर्षी मार्च २०२५ रोजी देखील मोठी आग लागून १०० ते १२५ उत्पादनक्षम ‘वेंगुर्ला-४ व ७’ जातीची काजू कलमे नष्ट झाली होती. त्याआधीही २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी संशयास्पदरीत्या लागलेल्या आगीत कळणे सडा व आसपासचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. त्याच रात्री लक्ष्मण तुकाराम देसाई यांच्या शेतमांगरालाही आग लावून यंत्रसामग्री जाळली गेली असून, संबंधित प्रकरणाची नोंद पोलिसांत कारण्यात आली होती अशी माहिती संजय देसाई यांनी दिली आहे.
श्री. देसाई स्थानिक शेतकऱ्यांच्या व म्हणण्यानुसार, ही आग नैसर्गिक वणवा नसून हेतुपुरस्सर लावली जात असल्याचा संशय आहे. परिसरात बाहेरील मद्यपी गटांचे येणे-जाणे वाढले असून मद्यपानादरम्यान पेटत्या सिगारेट किंवा मेणबत्ती आगीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होते. काही प्रकरणांत थेट दुष्ट प्रवृत्तीने आग लावण्यात आली असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेसोबत वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत आणि भविष्याची स्वप्ने राख होत आहेत, याबद्दल शेतकरी हतबल झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दोषींचा शोध लागत नसल्याने प्रशासनाची कार्यपद्धतीवरही शेतकरी वर्गातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे कळणे सडा परिसरात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
स्थानिक शेतकरी संतप्त
“फक्त पंचनामा आणि कागदोपत्री प्रक्रिया होते; नुकसानभरपाई मिळत नाही, दोषीही सापडत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही नेमकं कुणाला जबाबदार धरणार? मद्यपींना, मनोविकृतीला, की प्रशासनाला?” असा सवाल संजय देसाई व बाधित शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.










