SRMमध्ये करियर कट्टा

उद्योगमंत्री उदय सामंत उद्घाटक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 18, 2025 15:19 PM
views 48  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यलयात करियर कट्टा हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यलयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून राज्यभरातून विविध विद्यापीठातील आणि जिल्ह्यातील सुमारे ३०० प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर पालकमंत्री, आमदार यांच्या उपस्थितीसोबतच उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन सुद्धा या कार्यशाळेत होणार आहे, अशी माहिती कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

संत राऊळ महाराज महाविद्यालयात होणाऱ्या करियर कट्टा संदर्भातील  राज्यस्तरीय कार्यशाळेविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा कार्यशाळेच्या प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे, कार्यशाळेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अजित दिघे, पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यलाय शिरगावचे प्राचार्य प्रा. समीर तारी, प्रा. अजित कानशिडे उपस्थित होते. 

यावेळी माहिती देताना जिल्हा समन्वयक  प्रा. डॉ. अजित दिघे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करणे हा करियर कट्टाचा महत्वाचा उद्देश आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शहरात जाऊन खर्चिक असलेलं अधिकच मार्गदर्शन घ्यावं लागू नये यासाठी करियर कट्टा काम करते. करियर कट्टा द्वारे एकही रुपया खर्च न करता विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो हे या करियर कट्टाचे वैशिट्य आहे. दुसरं म्हणजे करियर कट्टाच्या वतीने उद्योजकता विकास हे धोरण राबविले जाते. नोकरी मागणारे हात न बनता नोकरी देणारे हात बनविणे हा त्या मागचा उद्देश आहे. त्याच बरोबर कौशल्य विकास हा एक मुद्दा करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. या करियर कट्टाची दिशा ठरविण्यासाठी एक मार्गदर्शन कार्यशाळा दरवर्षी घेतली जाते. यंदा हि कार्यशाळा दि. २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात होणार असल्याचे प्रा. डॉ. दिघे यांनी सांगितले. 

शनिवारी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यशाळेचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, मुंबई विद्यापीठाचे  प्रकुलगुरू अजय भामरे, उच्च शिक्षण विभाग मुंबईचे सहसंचालक किरणकुमार बोंदर,  विभागीय प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रचे अध्यक्ष यशवंत शितोळे,  प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. दिलीप भारमल व प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, विभागीय समन्वयक प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, सहविभागीय समन्वयक प्रा. डॉ. बबन सिनगारे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अजित दिघे उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी रविवार दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह इंजिनिअरिंग आणि व्हॅल्यू मॅनेजमेंट सल्लागारचे चेअरमन राजन नगरे, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड, पुणेचे  उपमहाव्यवस्थापक  रवींद्र पडवळ, आमदार दीपक केसरकर, राज्याच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रा. समीर तारी यांनी दिली. 

 करियर कट्टाच्या या दोन दिवशीय कार्यशाळेत राज्यातील प्रत्येक विद्यापिठातील, प्रत्येक जिल्ह्यातील प्राचार्य आणि जिल्हा प्रवर्तक उपस्थित राहणार आहेत. सुमारे १५० प्राचार्य आणि तेवढेच जिल्हा प्रवर्तक या कार्यशाळेसाठी उपस्थित असतील असे प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी सांगितले. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी  विद्यार्थी संवाद उपक्रमाचा आढावा मांडणे, करिअर संसदेचा आढावा तसेच दिनांक 25 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजीच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चा करणे, करिअर संसदेतील पदाधिकाऱ्याऱ्यांचे विभागीय अधिवेशन, राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी करणे, 'Al Teacher' या विषयावरील FDP चे नियोजन करणे, स्टेट रिसोर्स सेंटर नियोजन पहिल्या टप्प्यातील 5 स्टेट रिसोर्स सेंटर महाविद्यालयांचे सादरीकरण, सेंटर ऑफ एक्सलन्स निवड प्रक्रिया व विद्यार्थी नोंदणी आढावा, विद्यापीठनिहाय करिअर कट्टा वाढीसाठीचा कृती आराखडा तयार करणे, कौशल्य विकास विभाग आणि CSR यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम राबवणेबाबत चर्चा करणेकौशल्य विकास विभाग आणि CSR यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम राबवणे याबाबत चर्चा होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.  २६ ऑक्टोबरला या कायर्यशाळेची सांगता होणार आहे.  या दिवशी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी दिली.