देवगड - निपाणी महामार्गावर कारची जोरदार धडक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 22, 2024 06:24 AM
views 399  views

देवगड : देवगड तालुक्यातील कट्टा येथील तीव्र वळणावर दोन वाहनांमध्ये धडक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार देवगड येथील वॅगनार घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना देवगड कट्टा येथे ईरटीका गाडी देवगडच्या दिशेने येत असताना झालेल्या अपघातामध्ये वॅगनार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. मात्र सुदैवाने अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक विनायक केसरकर, विजय बिरजे, आशिष कदम, तसेच वाहतूक पोलीस विशाल वजन, यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रिक्षा व फोर व्हीलर मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाला आपला प्राण गमवावा लागला होता. या तीव्र वळणावर आंब्याचे झाड येत असल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे हेझाड तोडण्यात यावे अशी मागणी देखील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. मात्र याकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहणार हे पाहावे लागणार आहे.