
कुडाळ: महिला आणि पुरुषांमधील कॅन्सरचे लवकर निदान आणि उपचार सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक विशेष कॅन्सर निदान व्हॅन आज जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे दाखल झाली आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या गावांतच तपासणी आणि निदानाची सोय उपलब्ध करून देणार आहे.
या व्हॅनद्वारे प्रामुख्याने महिलांमधील स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तसेच पुरुषांमधील मुखाचा कॅन्सर यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. ही कॅन्सर व्हॅन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून, सध्या ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे.
या सुविधेबद्दल माहिती देताना जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांनी सांगितले की, "ही व्हॅन पुढे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन नागरिकांना तपासणी आणि निदान सेवा पुरवेल. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सोयीमुळे जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या गावातच कॅन्सर तपासणीची महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे."
डॉ. तेलंग यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते, त्यामुळे ही व्हॅन जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.