
कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवारी दाखल झाली. या व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर निदान तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १७० जणांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे - इंगवले, जिल्हा रुग्णालयाचे तुषार चिपळूणकर, एनसीटीच्या कार्यक्रमाचे समन्वयक केतन कदम, एनटीसीपी कार्यक्रमाचे समन्वयक संतोष खानविलकर, कर्करोग तज्ज्ञ वैशाली तेली, एसटीच्या परिचारिका सोनिया तेली, सचिन तांबे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
कॅन्सर मोबाईल व्हॅन कणकवली तालुक्यात ७ आॅगस्टपर्यंत असणार आहे. या कालावधीत कनेडी, नांदगाव, फोंडाघाट येथे या व्हॅनमधील उपलब्ध सुविधांद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. मंगळवार ५ आॅगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बुधवार ६ आॅगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत नांदगाव प्राथमिक आारोग्य, गुरुवार ७ आॅगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत फोंडाघाट आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व्हॅन असेल. या शिबिरांतर्गत मोफत कॅन्सर तपासणी व जनजागृती केली जाणार आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. पूजा काळगे-इंगवले यांनी केले आहे.