कुडाळात २२ डिसेंबरला विधी सेवा प्राधिकरणमार्फत महाशिबिर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 17, 2024 18:45 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग,  जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ डिसेंबर रोजी कुडाळ येथे शासकीय सेवा वयोजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सचिव श्रीमती संपूर्णा कारंडे यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, जिल्हाधिकार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या कालावधीत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी पिंगळी या ठिकाणी विधी सेवा आणि शासकीय सेवा वयोजनांच्या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये शासकीय योजनांची व त्याकरिता अर्ज करण्यासाठी सुवर्णसंधी असणार असून, सरकारी कार्यालयाच्या विविध स्टॉलला भेट देता येणार आहे. या ठिकाणी सुमारे ३० स्टॉल असणार असून या स्टॉलला भेटी देऊन विधी सेवा तसेच शासकीय योजनांचा फायदा घेता येणार आहे.

या महा शिबिरामध्ये जिल्हा सेवा प्राधिकरण मार्फत पुरविला जाणाऱ्या सेवा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद कार्याल, ग्रामपंचायत विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग माध्यमिक, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग अशा विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

या महा शिबिराचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई चे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या हस्ते होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तसेच महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष वकील संग्राम देसाई, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक आदी उपस्थित असणार आहेत.

या महाशिबिराचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सचिव संपूर्णा कारंडे तसेच कुडाळ तालुका वकील संघटनेच्या अध्यक्ष वकील राजश्री नाईक यांनी केले आहे.