
कणकवली : वागदे-टेंबवाडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अल्पावधीत गजाआड केले आहे. त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
गुरुवारी रात्री प्रदीप शांताराम भोगले यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बाथरूममधील नळ आणि दरवाजावरील पितळी कडी-कोयंडा असा सुमारे १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तत्पर कारवाई करत संशयित शंकर नवलाप्पा पवार (वय ६७, मूळ रा. सोलापूर) याला शुक्रवारी सायंकाळी कणकवली शहरातील मराठा मंडळ सभागृहाजवळ अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्याला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर, चोरी केलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी शंकर पवार याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी शंकर पवार हा यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची पोलिस ठाण्यात नोंद असून इतर ठिकाणी त्याने चोरी केली आहे का ? याचा देखील तपास सुरू आहे.










