बुलेट चोरणारा गोव्यातील पिल्ले ताब्यात

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2025 16:43 PM
views 767  views

सावंतवाडी : बांदा येथे रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल बुलेट चोरणाऱ्या गोवा राज्यातील म्हापसा येथील रहिवासी असलेल्या भुवन तिलकराज पिल्ले, वय 19 या चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने 4 जुलै रोजी आवळल्या आहेत. 

पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार डॉमनिक डिसोजा, सदानंद राणे, बसत्याव डिसोझा व जॅक्सन घोणसालवीस यांनी 4 जुलै रोजी ही कामगिरी फत्ते केली. बांदा पोलीस ठाण्यात रोहित श्रीकृष्ण काणेकर (रा. बांदा कट्टा कॉर्नर) यांच्या फिर्यादीनुसार बुलेट दुचाकी चोरीचा गुन्हा कलम 303(2) दाखल होत. काणेकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीची MH 07 AL 9410 ही बुलेट मोटारसायकल 5 जून 2025 रोजी अज्ञात इसमाने काणेकर यांच्या काकाच्या घरासमोरून चोरून नेली होती. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी रेकॉर्ड झाली होई. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही व मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषनाचे आधारे संशयित आरोपी भुवन तिलकराज पिल्ले, वय- 19, राहणार म्हापसा, राज्य- गोवा यास निष्पन्न करून कोलवाळे पोलीस ठाणे हद्दीत संशयितरित्या फिरत असताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.संशयित आरोपी पिल्ले यास वरील गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा आपण व आपले अन्य दोन साथीदार यांनी मिळून केला असल्याचे सांगत आहे. तसेच नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल बुलेट मोटर सायकल आरोपी याच्याकडून जप्त केली आहे.