बौद्ध बांधवांचा 28 एप्रिलला मेळावा

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2025 12:33 PM
views 249  views

सावंतवाडी : भगवान गौतम बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले ते बोधगया येथील महाविहार हे जगभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि अस्मिता असणारे एकमेव ठिकाण आहे. मात्र या विहारावर होणारे अन्य धर्मियांचे अतिक्रमण हे बौद्ध संस्कृतीवर होणारे अतिक्रमण आहे. यात मोठे षडयंत्र असून हे षडयंत्र मोडून महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी बौद्धांची एकजूट महत्वाची असल्याने बौद्ध बांधवांनी 28 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विराट बौद्धांच्या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन द बुद्धिस्ट फेडरेशनचे निमंत्रक विद्याधर कदम यांनी रविवारी सावंतवाडी येथे केले.     

बिहारमधील बोधगया येथे जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थान असलेले महाविहार हे गेली अनेक वर्ष इतर धर्मियांच्या ताब्यात आहे. हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी जगभर गेले अनेक वर्ष आंदोलने सुरू आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांचे एकत्रीकरण करून बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी रविवारी सावंतवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री कदम मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष संदीप कदम, मालवण तालुका बौद्ध सेवा संघाचे सचिव आनंद किर्लोस्कर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा चिटणीस आनंद धामापूरकर, प्रवक्ते आनंद कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रेरणाभूमीचे सचिव तथा पत्रकार मोहन जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिल्ह्यात या महामोर्चाला जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तसाच उस्फुर्त प्रतिसाद सावंतवाडी तालुक्यातही मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्यात बौद्ध बांधवंची संख्या कमी आहे. मात्र बौद्ध विचारसरणी मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. या सर्वांना विश्वास साथ घेऊन या मोर्चाचे नियोजन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्याधर कदम यांनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने असणारा बौद्ध समाज विविध संघटनात विखुरलेला असला तरीही या मोर्चाच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्रित झाल्याचे त्यांनी सांगून जिल्ह्यात आपली ताकद, शक्ती संघटन दाखवण्याची ही संधी असल्याने सर्व संघटना यात उत्स्फूर्त  सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभूतपूर्व असा हा महामोर्चा होईल असा आशावाद व्यक्त केला.        

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम यांनी सध्याचे देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण याची माहिती सांगून हा देश ज्या संविधानावर चालतो ते संविधानाच बदलण्याची सध्या प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगून बौद्ध समाजाच अशा प्रवृत्तींना रोखू शकतो. हे दाखवण्याची वेळ जवळ आल्याचे तिने सांगून या मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद  दाखवा असे आवाहन केले. व हा मोर्चा 100% यशस्वी करू असे आवाहन केले. शेवटी आनंद धामापूरकर यांनी आभार मानले.     

यावेळी सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते सर्वश्री वासुदेव जाधव, सगुण जाधव, मोहन जाधव, कांता जाधव, परशुराम जाधव, सुरेश जाधव, तिळाजी जाधव, ममता जाधव, सुनील जाधव, चंद्रकांत जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोर्चाचे नियोजन कसं करावं याबाबत चर्चा घडवून तसे नियोजन केले.