
सावंतवाडी : कुणकेरी येथील ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या सततच्या होणाऱ्या अनियमित सेवेला कंटाळून त्याचा जाब विचारण्यासाठी सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या जिल्हा मुख्य कार्यालयाला धडक दिली. मागील दोन वर्षापासून कुणकेरी येथील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. यासंदर्भात कित्येक वेळा निवेदने दिली गेली. परंतु त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही.
वीजपुरवठा खंडित झाला असता बीएसएनएलचा टॉवर लगेचच बंद पडतो. त्याला बॅटरी बॅकअपची सिस्टीम नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता " आम्ही मागणी केली आहे, आमच्याकडे वस्तू आली तर आम्ही लावणार! आम्हाला भेटून काही होणार नाही, तुम्ही खासदारांना भेटा त्यांना निवेदन द्या, अशी उडवाउडवीची उत्तरे या अधिकाऱ्यांकडून दिली जातात.
यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी मात्र अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आम्ही रिचार्ज पूर्ण महिन्याचे करतो आणि सेवा मात्र २० दिवसच मिळत असेल तर तुमचा टॉवर बंद करून टाका, पण लोकांचे नुकसान करून फुकट पैसे लाटण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. ही सेवा तात्काळ सुरू न केल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मंगेश सावंत, भरत (भाऊ) सावंत, विनायक सावंत, विश्राम (बाळा) सावंत, अभिजित सावंत, मनोज घाटकर, दादा खडपकर, एकनाथ सावंत, महादेव गावडे, विनोद सावंत, बाळकृष्ण सावंत, संदेश सावंत सहदेव घाटकर, सीताराम सावंत, नरेश परब, संजय लाड उपस्थित होते.