
चिपळूण : तालुक्यातील पंधराव परिसर गेल्या काही वर्षापासून विकासापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. भौतिक सुविधांची वानवा आहे. काही वर्षांपूर्वी येथे ठिकाणी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र हा टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकारी, तसेच केंद्रीय स्तरापर्यंत पत्रव्यवहार केला, तरिही बीएसएनएलची सेवा सुरू झालेली नाही. परिणामी या परिसरातील माजी सैनिक आणि ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करीत आहेत.
सह्याद्रीच्या जावळी खोर्यात वसलेला खेड तालुक्यातील पंधरागाव परिसरातील ग्रामस्थांची नाळ चिपळूणशी जोडलेली आहे. शासकीय कामे वगळता व्यवसाय, नोकरी व बाजारपेठेत खरेदीसाठी येथील ग्रामस्थांना चिपळूणात धाव घ्यावी लागते. खेड तालुक्यातील आंबडसपर्यंत बीएसएनएलची चांगली सेवा मिळते. मात्र पंधरागाव, धामणंद, काडवली, कुंभवली, मुसाड, वावे, चोरवणे, पोसरे, तळवट, तालीम, कासई आदी परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील बीएसएनएलचा टॉवर बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरातील सर्वच गावात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे, तर सध्या भारतीत सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांची संख्याही येथे जास्त पाहायला मिळते. नोकरी, व्यवसाय निमित्ताने परगावी असलेल्या मुलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता येतो.
मुसाड खांदाट परिसरात बीएसएनएल नेटवर्क पंधरा-वीस दिवसांपासून बंद आहे. महिन्यातून पाच-सहा दिवस टॉवर बंद असतो. शेजारी असेलल्या धामणंद येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावरती बीएसएनएलचा टॉवर आहे. परंतु तो अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये असतो. वारंवार पाठपुरावा करूनही बीएसएनएल प्रशासन लक्ष देत नाही. लाईट गेल्यानंतर तिथे पर्यायी डिझेल, जनरेटर बॅटरी बॅकअप नाहीये. त्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे, परंतु लक्ष देत नाहीत.