
सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक दिली. यावेळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कोलमडलेल्या बीएसएनएल सेवेबाबत जिल्हा प्रबंधक रविकिरण जुन्नू यांच्यावर मतदार संघातील उबाठा शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नाचा भडिमार केला. खाजगी मोबाईल कंपन्यांची टार्गेट पूर्ण करण्यात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याने जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा सुधारत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर येत्या काही दिवसात सेवा सुधारा. अन्यथा, कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडावे लागेल असा इशारा माजी खासदार राऊत यांनी दिला.
सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलमडलेल्या बीएसएनएल नेटवर्कबाबत आणि अन्य विविध समस्यांबाबत राऊत यांनी जिल्हा प्रबंधक जुन्नू यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक बीएसएनएल कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी गावागावातील बीएसएनएल टॉवर आणि तेथील समस्यांबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, रमेश गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच महेश गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, रमेश गावकर, मंदार शिरसाट योगेश धुरी विनोद ठाकूर, सागर नाणोसकर, उमेश नाईक, अवी धातोंडकर, विजय देसाई, मिलिंद नाईक, लक्ष्मण आयनोडकर, संदेश वरक आदी उपस्थित होते.
यावेळी जेथे समस्या आहेत अशा बीएसएनएल टॉवर संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक जुन्नू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दाभोळ गावात टॉवर उभा करूनही अनेक वर्ष तो बंदच असल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. तसेच सोनुर्ली येथील टॉवर विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर बंद पडतो त्या ठिकाणी बॅटरी बॅकअप चोरीला गेले. याशिवाय जनरेटर सडल्याबाबत लक्ष वेधले. वांगणी येथे हरिचरणगिरी टॉवरबाबत येथील सरपंचांनी उपोषण करून सुद्धा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अद्यापपर्यंत मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यात आलेला नाही. त्या आठ दिवसात टॉवर सुरू झाल्यास आपण कायदा हातात घेणार असल्याचे सरपंच श्री आतोंडकर यांनी सांगितले. तर आठ दिवसात या टॉवरचे काम मार्गी लावा अन्यथा हा माझ्यासह गावातील ग्रामस्थांना घेऊन आपण कार्यालयात धडक देऊ असा इशारा राऊत यांनी दिला.
दरम्यान, अन्य कंपन्यांच्या सिमकार्ड खरेदी मागे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे कमिशन दडलेले आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा सुरळीत न करण्यामागे अधिकाऱ्यांचे आर्थिक साटोलोटे असल्याचा आरोपही अनेकांनी केला. खाजगी कंपन्या आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचा वापर करतात असेही अनेकांनी सांगितले. दरम्यान ग्रामस्थांच्या समस्या आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची हलगर्जपणा लक्षात घेता माजी खासदार श्री राऊत यांनी श्री जुन्नू यांना पुढील बैठकीपूर्वी सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचित केले. तसेच दोडामार्गमध्ये सद्यस्थितीत हत्तींचे संकट मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी हत्तीकडून मनुष्यहानी झाली आहे. हत्ती ज्या ठिकाणी येतात तेथील लोकेशन समजण्याकरता वनविभागाकडून ग्रामस्थांना मेसेज दिला जातो. मात्र, नेटवर्क अभावी बऱ्याचदा असे मेसेज ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी बीएसएनएलची सेवा अखंडित सोयीत ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. कोणत्याही समस्या असतील त्या त्वरित निकाली लावाव्यात अशा सूचनाही यावेळी राऊत यांनी केल्या.