
सावंतवाडी : देशाचे आजपर्यंतचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'सबके साथ सबका विकास' या विचाराला प्रत्येक घराघरात पोहोचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. २०१४ नंतर भारताला सर्वांगीणदृष्ट्या सशक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अभिनव अशा योजना अस्तित्वात आणल्या. आज त्यांच्या उदात्त विचारामुळेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीचा थेट खात्यात जमा झाला. यापुढेही केंद्रातून येणारा प्रत्येक रुपया हा त्या-त्या लाभार्थीच्या खात्यात थेट जमा होतो. आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. म्हणून प्रत्येकाने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक घरात त्यांचे सशक्त विचार पोहोचवावेत, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे त्यांच्या निवासस्थानी केसरी परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण ठेवले होते. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' सांगितल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी व जनतेशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस बंटी पुरोहित, राजन वराडकर, संदीप गावडे व अन्य उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, आपल्याला जनतेने निवडून दिले याचा अर्थ जनतेचा आपल्या कार्यक्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच आपली निवड सार्थ कशी असावी? याबाबतीत प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. आपण काम करीत असलेल्या प्रत्येक वाडीवस्तीतील प्रत्येक घराघरात नेमकी काय परिस्थिती आहे? याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्याचा डेटा उपलब्ध करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार कसा निर्माण करता येईल? यावर शासन स्तरावरून जे - जे शक्य असेल ते करण्याचा माझा मानस आहे. मात्र यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी योग्य माहितीचे संकलन करणे अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित विविध गावातील सरपंच व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही पालकमंत्र्यांनी दिलेत.