कोकण म्हणजे समृद्धी हे दिल्लीपर्यंत पोहचवा : नारायण राणे

Edited by:
Published on: August 09, 2024 13:38 PM
views 168  views

सावंतवाडी : कोकण म्हणजे समृद्धी ही संकल्पना दिल्लीपर्यंत जावी यासाठी प्रयत्न करा. जिल्ह्याच दरडोई उत्पन्न अडीच लाख कोटींपर्यंत मी घेऊन गेलो. यापुढे मंत्री रविंद्र चव्हाण ते चार लाख कोटींपर्यंत घेऊन जातील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत प्रगत होत आहे. अशावेळी भांडण, तंटे, जात-पात विसरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कार्यरत रहा अस प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केलं. सावंतवाडी येथील रेल्वे स्थानक सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 

खासदार राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग व सावंतवाडीच्या स्थानकांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांनी देखील हॅट्रिक केली. जिल्ह्याचा विकास गतिमान दिशेने जात आहे. रेल्वे स्थानकाकडे आल्यावर आनंद होतो, प्रसन्न वाटत. राज्य सरकार, मंत्री रविंद्र चव्हाण, बांधकाम विभाग व कोकण रेल्वेच यासाठी अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. योग्य प्रकारे विकास साधला तर हा जिल्हा देशातील विकसित जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. शेजारील गोवा राज्याची आर्थिक उलाढाल ही पर्यटनाच्या माध्यमातून आहे. तेच वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यास आपलं दरडोई उत्पन्न वाढणार आहे. पर्यटनातून प्रगती साध्य करता येणार आहे. औद्योगिक क्रांतीला देखील आज महत्व आले आहे. माझा जिल्हा कसा प्रगत होणार याचा विचार सर्वांनी करणं आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यात सर्वकाही आहे. अंतर्गत स्पर्धेशिवाय बाहेरील उद्योजकांसोबत स्पर्धा करा. आंबा, काजू, फणसाला जगात मागणी आहे. त्यातून उत्पादित होणाऱ्या पदार्थालाही मोठी मागणी आहे. मात्र, त्यासाठीचे कष्ट आपण घेत नाही, ते घेणं आवश्यक आहे. आपण पहात राहतो, बाजारात येत ते खात राहातो, बनवत नाही. त्यामुळे ते बनवणं आवश्यक आहे. व्यवसाय केल्यास मोठं उत्पन्न प्राप्त होईल असं मत राणेंनी व्यक्त केल.

दरम्यान, रविंद्र चव्हाण यांनी अभिमान वाटाव असं रेल्वे स्थानकाच सुशोभीकरण केलं आहे. याचा फायदा लोकांनी घ्यावा, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. कोकणी माणूस हुशार आहे. मुंबई सारख उत्पन्न आपलं व्हाव यासाठी कोकणी माणसाने प्रयत्न करावेत. आम्ही प्रगती करत राहू. मात्र, व्यवसायाशी स्पर्धा आपल्याला करायची आहे‌. आजचा सामारंभ बोध घेण्यासाठी आहे.