
सावंतवाडी : राज्यस्तरीय ज्युनियर अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षाखालील मुलींच्या गटात सिंधुदुर्गच्या केशर व १८ वर्षाखालील गटात दिक्षा यांनी विजेतेपद पटकावून सिंधुदुर्गसाठी दुहेरी यश मिळविले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इंस्टिट्यूट, दादर यांच्या सहयोगाने दादर येथे संपन्न झालेल्या ५८ व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी केशर निर्गुण हीने ठाण्याच्या सखी दातार हिच्याबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात १८-४,८-९,१३-४ अशी मात करून विजेतेपद पटकाविले. १८ वर्षाखालील गटात कणकवलीच्या दिक्षा चव्हाण हिने मधुरा देवळेवर १३-१,७-१९,१६-१ अशी मात करून विजेतेपद पटकाविले.
केशर निर्गुण हिने दाेन वर्षापूर्वी झालेल्या कनिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले होते.विजेत्या खेळाडूंना विश्वविजेते योगेश परदेशी,राष्ट्रीय कॅरम खेळाडू संदीप देवरुखकर,संजय मांडे,योगेश धोंगडे,सेंट्रल रेल्वे इंस्टिट्यूट, दादरच्या सदस्य प्रशांत पेडणेकर यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कार्यकारिणी सदस्य संतोष चव्हाण उपस्थित होते. केशर निर्गुण व दिक्षा चव्हाण या दिनांक २३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व कॅरम प्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.