
मंडणगड : तालुक्यातील विसापुर मार्गावर सार्वजनीक बांधकाम विभाग मंडणगड यांच्या कार्यक्षेत्रात भर पावसात सुरु असलेल्या पुलांचे कामामुळे विन्हे येथील ग्रामस्थ गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभावीत झालेले असून ग्रामस्थांची चाळीस एकरातील भातशेती कामातील तांत्रीक दोषामुळे नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांवर यावर्षी शेती अभावी वर्ष घालवण्याची नामुष्की ओढवली आहे. याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याचबरोबर पावसात सुरु असलेल्या कामामुळे परिसरात सर्वत्र पाणी भरल्याने गावांचा अन्य ठिकाणीशी असलेला संपर्क वांरवार तुटल्याने ग्रामस्थांचे नैमीत्तीक जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावीत झालेले असल्याची प्रतिक्रीया समस्याग्रस्त ग्रामस्थांनी दिली आहे. विन्हे गावातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील अवजड वाहतूक गेल्या पंधरा दिवस ठप्प करून सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावरील पुलाचे काम करत राहिले. त्यामुळे या कालावधीत विन्हे येथील ग्रामस्थांचे मात्र प्रचंड हाल झाले. एसटी वाहतूक बंद राहिल्यामुळे सुमारे चार किमीची पायपीट येथील ग्रामस्थांना करावी लागली बँकीग, दवाखाना, बाजार इत्यादी सर्व कामासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागला. ठेकेदार व बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा नाहक फटका येथील नागरिकांना सहन करावा लागला. यानिमित्ताने विविध प्रश्न निर्माण झाले आहेत महामार्गावर काम करताना वाहतूक बंद करण्याची नवीन कार्यपद्धतीचा बांधकामने शोध लावला आहे का, तसा अधिकार बांधकाम विभागाला कोणी दिला, असे अनेक प्रश्न या निमीत्ताने चर्चेत आले आहेत. पावसात काम करण्याचे अट्टहासाने निर्माण झालेली विशिष्ठ परिस्थिती ग्रामस्थांच्या अडचणी वाढवत आहे. राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात परिसरात साठलेले पाणी निचरा होण्याची परिस्थिती नसल्याने साठून राहीले आहे.
तालुक्यातील महाड – लाटवण- विसापूर – दापोली राज्यमार्गावरील लाटवण– विसापूर रस्त्याचे नुतनीकरणाचे यंदाचे हंगामात प्रगतीपथावर राहीले यात मार्गाचे रुंदीकरण केले गेले कामाचा हंगाम संपला तरी काम अद्याप सुरूच आहे. घाईघाईने होत असलेल्या कामामुळे कामाचे नियोजन फसले आणि ऐन पावसात केलेल्या पुलाच्या कामाचा फज्जा उडाला. मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंडणगड यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासामुळे येथील नागरिकांमध्ये विभागाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, महाड – लाटवण – दापोली या राज्यमार्गातील लाटवण ते विसापूर याअंतरातील रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरणाच्या कामाचा ठेका महाड येथील कन्स्ट्रक्शन एजन्सीला मिळाले आहे.
ऐन पावसाळी मोसमात देखील ठेकेदाराने काम सुरु ठेवल्याने या मार्गावरील विन्हे गावानजीक छोट्या पुलाचे काम अर्धवट स्थितीत राहिले. त्यामुळे मागील पंधरा दिवस या राज्यमार्गावरील मोठ्या वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली. यानिमित्ताने मंडणगड मधील बांधकाम विभागाच्या कार्यपद्धती विषयी तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांत अनेकवेळा गुणवत्ता व सबंधित कामांचे करण्यात येणारे अंदाजपत्रक याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित केल्या जातात. या विभागाच्या वतीने पूल व रस्तेविकासासाठी वर्षभरात करोडोरुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र त्याच त्याच रस्त्याच्या लांबीमध्ये मोठ्या निधीचा खर्च करणाऱ्या या विभागाला एखादे नाविन्यपूर्ण विकासकाम साध्य करता आले नाही.
एएमसी अंतर्गत खड्डे बुजवण्याचे अनेक कामे हि त्याच त्याच रस्ते लांबीमध्ये केली जात असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. या योजनेतील कामे नेहमीच वादातही अडकली आहेत. केवळ अस्तित्वात असलेल्या विकासकामांवर अनेक वेळा निधी खर्च करून मलमपट्टी करण्याचे काम विभागामार्फत होत असल्याचे तालुकावासियांमधून आता बोलले जात आहे.