
कणकवली : कणकवली शहरात राजरोसपणे अंदर बाहर जुगार सुरू असून या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांकडून कधी कारवाई होणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. वर्षभरापूर्वी कणकवली पोलिसांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी कारवाईकरण्यात आली होती. कणकवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या नागवे गावच्या हद्दीवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे जुगारी काही दिवस शांत होते. पण आता पुन्हा मोठ्या प्रमाणात या जुगार अड्ड्यांना चालना मिळाली आहे. शहरातील मुंडेडोगरी गारबेट डेपो, व कणकवली मलये मायनिंग नागवे रस्ता, मुंडेडोंगरी पाणी प्लॅन्ट जवळ, गणपती साना या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे नुकताच कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले अनिल जाधव या अवैध धंद्यांवर कारवाई कधी करणार, असाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.