
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील नवरात्र उत्सवात आयोजित खुल्या फुगडी स्पर्धेत आमोणा (गोवा) येथील ब्रह्मेश्वर महिला फुगडी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. मणेरी येथील श्री राष्ट्रोळी फुगडी गटाने द्वितीय क्रमांक, तर खरपाल (गोवा) येथील श्री बाबा कोळगेश्वर महिला मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
आंबेली येथील श्री सातेरी फुगडी ग्रुप तसेच पीर्णा (गोवा) येथील श्री हनुमान पूरमारेश्वर सांस्कृतिक कला केंद्राला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेचे आयोजन नवरात्र उत्सव २०२५ च्या निमित्ताने गणेशोत्सव-नवरात्र उत्सव मंडळाने केले होते. बाजारपेठेतील चिन्मय क्लासेसच्या संचालिका सीमा सदानंद प्रसादी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भव्य फुगडी स्पर्धेत सिंधुदुर्ग आणि गोवा मिळून तब्बल बारा फुगडी ग्रुपनी सहभाग घेतला होता. एकापेक्षा एक सरस सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
बक्षिसे :
प्रथम : ब्रह्मेश्वर महिला फुगडी ग्रुप (रोख ५,००० रुपये)
द्वितीय : श्री राष्ट्रोळी फुगडी ग्रुप (रोख ३,००० रुपये)
तृतीय : श्री बाबा कोळगेश्वर महिला मंडळ (रोख २,००० रुपये)
उत्तेजनार्थ : श्री सातेरी फुगडी ग्रुप (आंबेली) व श्री हनुमान पूरमारेश्वर सांस्कृतिक कला केंद्र (पीर्णा) गोवा – प्रत्येकी १,००० रुपये
परीक्षक म्हणून अंकुश मिरकर व सागर नाईक यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आनंद कामत यांनी केले. पारितोषिक वितरण प्रसंगी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन मणेरीकर, सीमा प्रसादी, रजत राणे, चिन्मय प्रसादी, अजित हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फुगडी स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र-गोव्याच्या अनेक संघांनी घेतलेल्या सहभागामुळे या पारंपरिक कलेला उभारी मिळाली असून, लोकसंस्कृती जपण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.










