
दोडामार्ग : शिरंगे येथे धरणाच्या जलाशयाला लागून काही काळ्या दगडाच्या खाणीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सुरु असलेल्या उपोषणाबाबतच्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सुचनेनंतर महसूल यंत्रणेने तातडीने कार्यवाही करत दिलीप गवस यांना लेखी पत्र देत दिलासा दिला आहे. येत्या १५ दिवसात शिरंगे येथील मागणी असलेल्या त्या क्षेत्रात जमीन मोजणी व हद्द निश्चिती बाबत कार्यवाही करण्याची सूचना देण्याचे, तसेच काजू बागायतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित खाण मालकास देण्याच्या सूचना देण्यात येईल असे लेखी आश्वासन या पत्राद्वारे दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार यांना दिले आहे.
वडिलोपार्जित आपल्या जमिनीत खडी उत्खनन व त्याच्या दगड, मातीमुळे काजू बागायतीचे नुकसान यामुळे न्याय मिळावा यासाठी यापूर्वी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा ईशारा दिलीप गवस यांनी दिला होता. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी योग्य त्या चौकशीचे आदेश महसूल प्रशासनाला दिल्याने दिलीप गवस यांनी त्यावेळचे उपोषण स्थगित केले होते. मात्र बराच कालावधी उलटून दगड खाणींवर कारवाई होत नसल्याने दिलीप गवस यांनी गुरुवारी उपोषण सुरु केलं होतं. याबाबत वृत्त प्रसिद्धी होताच स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी याची दखल घेत प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश दिले. पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार त्याचवेळी भूमीअभिलेख कडे जमीन मोजणीसाठी खाण असलेल्या मालकाने भूमी जमीन मोजणी व हद्द निश्चितीची मागणी केली होती. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ती प्रक्रिया लांबल्याचा खुलासा पालकमंत्री यांच्याकडे प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र यावर तातडीने तोडगा काढण्याचे व संबंधिताना न्याय देण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी देताच महसूल प्रशासनाने उपोषणकर्ते यांना येत्या १५ दिवसात जमीन मोजणी व हद्द निश्चिती व झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे लेखी पत्र दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार यांनी उपोषणकर्ते गवस यांना दिले आहे.
शिरंगेतील दगड खाणी अधिकृतच : जिल्हाधिकारी अनिल पाटील
दरम्यान शुक्रवारी शिरंगे येथील दगड खाणीं अनधिकृत असल्याचा उल्लेख केला जात असला तरी तेथील बऱ्याचशा खाणी अनधिकृत नाहीत तर त्या अधिकृत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी 'कोकणसाद' शी बोलताना दिली आहे. परंतु जर काही जण तेथे नियम आणि अटी शर्थिंच्या बाहेर जर काम करत असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. वाहतुकीच्या बाबतीतही असलेल्या तक्रारीस अनुसरून ते म्हणाले की, वाहतुक करताना धूळ उडणार नाही आणि ते नियमांचे पालन करतील याबाबत आम्ही प्रशासनला सूचना दिलेल्या आहेत. मात्र तेथील खाणी अनधिकृत नसून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.