
मुंबई : ४ ऑक्टोबरला शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महावाचन उत्सवानिमित्त, विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय यु.आर.सी.दोन मध्ये पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवयित्री व नाट्य अभिनेत्री कविता मोरवणकर उपस्थित होत्या. मुलांनी मोबाईल पेक्षा पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन केले तर आयुष्यात यशस्वी व्हायला निश्चितच मदत होईल असे सांगतानाच आपल्या कवितांचेही वाचन केले.यावेळी केंद्रप्रमुख व कवी असलेले विजय सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या दोन कविता सादर केल्या.
यावेळी महावाचन उपक्रमात भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पौर्णिमा माने मॅडम, ग्रंथपाल संतोष गावकर व इतर सहकारी व शिक्षकांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल यांनी केले तर मुख्याध्यापकांनी आभार मानले.सदर ग्रंथप्रदर्शनास आजुबाजुच्या परिसरातील दहा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन सदर उपक्रम यशस्वी केला.