श्री समर्थ साटम महाराज वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2025 16:46 PM
views 23  views

सावंतवाडी : तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्यावतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून "ग्रंथ प्रदर्शन", "मी वाचलेले पुस्तक" आणि "तुम्ही वाचा मुले वाचतील" असे अभिनव कार्यक्रम संपन्न झाले. वाचनालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, वाचनालयाचे अध्यक्ष तथा साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे सर, माजी सैनिक सहदेव राऊळ, सचिव ॲड. एल डी सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, गिरीधर चव्हाण, माजी सरपंच संजय लाड, समीर शिंदे, डॉ.विठ्ठल सावंत, विलास जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भरत गावडे यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रंथालयामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम आणि भविष्यातील वाटचाल याबाबत माहिती देतानाच वाचनाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक पटेकर यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे कवी दीपक पटेकर यांच्या हस्ते फित कापून पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ही ₹.५०००/- किंमतीची प्रसिद्ध लेखक प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि जयंत नारळीकर यांची पुस्तके डॉ. बी. डी. पाटील्यांच्या सहकार्याने वाचनालयास मिळाली आहेत.


यावेळी बोलताना दीपक पटेकर यांनी वाचन प्रेरणा दिन का साजरा करावा लागतो ? असा प्रश्न उपस्थित करून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले. मुलांना बालवयात मोबाईल वर गाणी, टिव्ही वरील कार्टून दाखवून त्यांना त्यात गुंतवून न ठेवता त्यांना प्राणी पक्षी यांची चित्रे असणारी पुस्तके, अक्षर ओळख झाल्यावर वाचनीय पुस्तके देऊन पुस्तकांची गोडी लावली पाहिजे. दुसरा चांगले कपडे घालतो म्हणून त्याला पाहून आपण तसा पेहराव करणे ठीक आहे. परंतु दुसरा कलेक्टर झाला म्हणून त्याला पाहून आपण कलेक्टर होणार नाही तर अधिकारी होण्यासाठी अवांतर वाचन करून कठोर परिश्रमातून ज्ञान आत्मसात करावे लागेल. वाचनाची सवय असेल तरच चांगलं लिखाण करता येईल, मुलांचा बुद्ध्यांक वाढेल असे सांगून मुलांना वाचन करण्याचा सल्ला दिला. 


 कार्यक्रमाचा गाभा म्हणजे "मी वाचलेलं पुस्तक" हा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मारुती चितमपल्ली यांच्या चैत्र पालवी या पुस्तकाचे लालित्यमय शब्दात सौ.प्रगती परांजपे यांनी अतिशय सुंदर रसग्रहण करून पुस्तकाचा परिचय करून दिला. तसेच जंगलांचं देणं या पुस्तकांवर भरत गावडे हे बोलले. पवन केसरकर, भूषण मुजुमदार यांनी देखील आपल्या ओघवत्या शैलीत पुस्तक परिचय करून दिला. खास आकर्षण म्हणजे कु.काव्या परांजपे या छोट्याशा मुलीने देखील आपल्या गोड आवाजात पुस्तकावर भाष्य केलं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दशक्रोशीतील शाळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थितांचे आभार डॉ.विठ्ठल सावंत यांनी मानले. यावेळी श्रीम. मधुवंती गो. मेस्त्री, श्रीम. जयश्री सु. कोरगावकर, श्रीम. किरण वि. केंगार यांच्यासह ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.