
वेंगुर्ले:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाच्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने मोहीम हाती घेतली आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट ओ+ / ओ- या रक्तगटाच्या व्यक्तीत आढळून येतो. त्यामुळे सर्व ओ पॉझिटिव्ह व ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींसाठी तपासणी शिबिर सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत उभादांडा- वेंगुर्ला येथे रोझारिओ मित्रमंडळ उभादांडा व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट म्हणून ओळखला जाणारा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप' (Oh /hh) हा जागतिक लोकसंख्येत १० लाखात ४ असे प्रमाण असणारा रक्तगट आहे. म्हणजेच आज जगातील ८०० कोटी लोकसंख्येत फक्त ४५० च्या आसपास या रक्तगटाच्या व्यक्ती आहेत.
वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या रक्तगटाच्या व्यक्ती जास्त प्रमाणात आहेत. आजपर्यंत सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून या रक्तगटाच्या १६ व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी तिघेजण तत्काळ रक्तदाते आहेत.
दरम्यान यावेळी या शिबिराचे उद्घाटन सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सल्लागार दयानंद गवस, उभादांडा ग्रामपंचायत सरपंच निलेश चमणकर, उपसरपंच टीना आल्मेडा, माजी गट शिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष विवेक तिरोडकर, रोझारिओ मित्रमंडळ अध्यक्ष डिक्सन ब्रिटो, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला कार्यकारिणीचे सचिव श्रीकृष्ण कोंडुसकर, उपाध्यक्ष राजेश पेडणेकर, प्रसाद नाईक, समृद्धी पिळणकर, आबा चिपकर, सचिन कोंडये आदी उपस्थित होते. तर सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, संजय पिळणकर उपस्थित होते. यावेळी रक्त तपासणीचे महत्वाची भूमिका पडवे एसएसपीएम रुग्णालयाचे मनिष यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पेडणेकर, तर आभार प्रदर्शन ऍलिस्टर ब्रिटटो यांनी केले.