तिलारीच्या कालव्यात कामगाराचा मृतदेह, साथीदार बेपत्ता

नशेत पडून मृत्यू की घातपात ?
Edited by: लवू परब
Published on: January 21, 2025 19:20 PM
views 141  views

दोडामार्ग : साटेली भेडशी थोरले भरड येथे तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. संजू नागाप्पा मुकुलकट्टी (३८, रा. मुळगाव हिरे होणारी, धारवाड, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी तो त्याच्या साथीदारासह गवंडी काम करण्यासाठी आला होता. मात्र, त्याचा साथीदार बेपत्ता असल्याची माहिती मुकादमाने पोलिसांना दिली. मृताच्या कपाळावर प्रथमदर्शनी जखमा दिसून आल्याने हा घातपात आहे की अन्य? अशी चर्चा सुरू आहे. 

 या घटनेबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की,  मयत संजू मुकुलकट्टी व बेपत्ता इसम मंजुनाथ होडागी हे दोघेही सहा महिन्यांपूर्वी खानयाळे येथे कामानिमित्त आले होते. ते तेथील एका फार्म हाऊसवर गवंडी काम करीत होते. अन्य साथीदारांसोबत एका खोलीत राहत होते. सोमवारी सायंकाळी दोघेही जेवणाच्या निमित्ताने साटेली भेडशी बाजारपेठेत गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ते रूमवर न परतल्याने त्यांच्या अन्य साथीदारांनी शोध घेतला. परंतु, ते कोठेच सापडले नाहीत. मंगळवारी दुपारी शोध घेत असता साटेली भेडशी थोरले भरड येथे कालव्यातील गेटजवळ बांबूला मृतदेह अडकून पाण्यावर तरंगत असल्याचे दृष्टीस पडला. लागलीच त्यांनी ही माहिती आपल्या मुकादमाला दिली. मुकादमाने पोलिसांना खबर देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्या बाहेर काढला. स्थानिक युवक महेश स्वार यांनी कालव्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली भेडशी ग्रामीण रुग्णालयात आणला.

नशेत पडून मृत्यू की घातपात ?

 मयत संजूचा मृतदेह कालव्यात आढळल्यानंतर अन्य साथीदारांची तारांबळ उडाली. एकाचा मृतदेह पाण्यात सापडला, तर दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. मयताच्या कपाळावर जखमा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे  त्याचा मृत्यू  नक्की मद्यधुंद अवस्थेत पाण्यात पडून झाला की घातपात झाला असावा ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.