
दोडामार्ग : मांगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजूबागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा आणि कशामुळे त्याचा जीव गेला घातपात कि आत्महत्या याबाबत कयास लावू लागले. अखेर दोडामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला.
घटनास्थळ पंचनामा आणि तिथल्या लोकांकडून माहिती घेतली असता सदरचा मृतदेह विर्डी येथील विदेश लाडू गवस (४५) या युवकाचा असल्याचे समजले. दोन दिवसांपूर्वी कामावर जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. तो आज अशा अवस्थेत मिळाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.