खळबळजनक | कुडाळ इथं हाॅटेलमध्ये महिलेचा मृतदेह..!

Edited by: भरत केसरकर
Published on: June 16, 2023 16:03 PM
views 122  views

कुडाळ : कुडाळ मधील एक नामांकित हॉटेल मध्ये मुंबईस्थित महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र, ही आत्महत्या कि घातपात? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू आहे. 

कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेल मध्ये 40 वर्षीय मुंबईस्थित महिला मंगळवार दि. 13 जून पासून रूम नं. 208 मध्ये राहत होती. तिच्या लगतच रूम नं. 209 मध्ये जिल्ह्यातीलच दोन युवक ( एक युवक कुडाळ तालुक्यातील ) राहत होते. हे दोन्ही युवक त्या महिलेच्या संपर्कात होते. त्यातीलच एका युवकाने त्या महिलेच्या नावे त्या हॉटेल मध्ये रूम बुकिंग केली होती.

शुक्रवारी ती महिला रूमचे दार उघडत नाही म्हणुन त्या युवकांनी हॉटेलच्या मॅनेजरला सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर कुडाळ पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच कुडाळ पोलिस स्थानकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील घटनास्थळी पोलिस हे. कॉ. श्री. माने व अन्य सहकार्‍या समवेत दाखल झाले.

घटनास्थळी पाहणी करून रूम नं. 208 मध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या स्थितीत असलेल्या त्या महिलेचा मृतदेह त्यांनी खाली उतरविला व अ‍ॅम्बुलन्सचे शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, कुडाळ पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन कल्पना दिली. यावेळी त्या महिलेच्या संपर्कात असलेले दोन्ही युवक घटनास्थळी होते. पोलिसांनी या घटनेची माहिती विचारताच संशय कलौळ वाढविणारी माहिती त्या युवकांनी दिल्याचे समजते. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात?  हे तपासानंतर स्पष्ट होईल. याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.