एलईडी मासेमारी प्रकरणी नौका जप्त

५ - ६ लाखांचं साहित्य जप्त
Edited by:
Published on: February 25, 2025 13:23 PM
views 192  views

देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी मासेमारीवर बंदी असून, याच अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत आचरा किनाऱ्याच्या समोर कारवाई करण्यात आली.

दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास 16°08.06N 73°14.04E या स्थानी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी पार्थ तावडे (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, देवगड) यांनी नियमित गस्त घालत असताना ही कारवाई केली. या वेळी महेश अनिल कामत (रा. मालवण) यांची नौका विघ्नहर्ता-५ (नोंदणी क्र. IND-MH-5-MM-228) ही महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे एलईडी लाईटच्या साहाय्याने मासेमारी करताना आढळून आली. नौकेवर तांडेलसह पाच खलाशी उपस्थित होते.

ही नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आली असून, नौकेवर कोणतीही मासळी आढळली नाही. तसेच नौकेवरील एलईडी लाईट्स व ती पुरवणारी उपकरणे कार्यालयात जप्त करण्यात आली आहेत. अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांच्या लाईट्स, जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने केली. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर प्रकरणाची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.