
सावंतवाडी : आरोंदा येथील मच्छिमार बांधवांनी फेरफार क्रमांक 2507 संदर्भातील प्रकरण मंडळ अधिकारी आजगाव यांच्याकडून अन्य सक्षम अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. सध्याच्या मंडळ अधिकाऱ्यान एका कंपनीशी आर्थिक हातमिळवणी केली असल्याचा संशय असून आपल्याकडे याबाबत खात्रीशीर पुरावे आहेत असा आरोप येथील भुमिपुत्र मतस्य शेतकऱ्यांनी केला आहे.
आज याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले. यात म्हटले आहे की, संबंधित मंडळ अधिकाऱ्यानं एका कंपनीशी आर्थिक हातमिळवणी केली असल्यानं ते निःपक्षपातीपणे काम करणार नाहीत. बाजू मांडण्याची संधी न देता संबंधित कंपनीच्या बाजूने निर्णय देतील. ज्यामुळे शेती, मत्स्यपालन संबंधित न्याय हक्क धोक्यात येणार आहेत. आम्हा शेतकरी, मच्छीमारांच्या न्याय हक्कांचे नुकसान होणारे असून तसे झाल्यास आम्हाला आमच्या जमिनीपासून, घरादारापासून व शेती, मच्छीमारीपासून वंचित रहावे लागणारे आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या अर्जाची दखल घेऊन फेरफार प्रकरणाची पुढील कार्यवाही निष्पक्षपणे होण्यासाठी योग्य ती चौकशी करण्यात यावी. चौकशीअंती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे फेरफार प्रकरण अन्य सक्षम मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत उचित निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या भुमिपुत्रांनी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी त्यांना निःपक्षपाती चौकशीचे आश्वासन दिले.
याप्रसंगी उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, मच्छिमार नेते तथा भूमिपुत्र गोळुळदास मोठे, हुसेनबागवाडीचे भूमिपूत्र रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, रामदास पेडणेकर, बलवंत शिवलकर, संतोष कोरगावकर, शिवराम कोरगावकर, गुणाजी शिवलकर, दयाळ मोठे, लक्ष्मण कोरगावकर, यशवंत सारंग, सुरेश सारंग, भिवा सारंग, चंद्रकांत सारंग, प्रथमेश नवघरे, भरत कोरगावकर, हरिश्चंद्र कोरगावकर, तुकाराम कोरगावकर, पांडुरंग कोरगावकर आदी उपस्थित होते.