रस्ते टिकावू होण्यासाठीच 'बीएम'!कार्यकारी अभियंता सर्वगोड

अर्धवट कामे ठेवलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कार्यवाही सुरू
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 02, 2023 15:39 PM
views 255  views

कणकवली : कणकवली एमपीएमसाठी हातफोडी हातफोडी खडी वापरण्यात येत असे. मात्र, आता सर्वच ठिकाणी क्रशरखडी वापरली जाते. परिणामी, इंटरलॉक न होता अनेक ठिकाणी लेव्हल राहत नाही. पाणी साचून खड्डे पडतात. यावर पर्याय म्हणजे बीएम करणे हाच आहे. यातून एमपीएमपेक्षा रस्ते अधिक टिकावू राहतात, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली. तसेच आपण कामांच्याबाबतीत कडक भूमिका घेतली असून अर्धवट कामे ठेवलेल्या तीन ठेकेदारांचा परवाना एकवर्षासाठी निलंबित केला असल्याचे त्यांनी सांगितले.


हातफोडीची खडी नसल्याने इंटरलॉक नाही

आयसीआरच्या नॉम्सनुसार एमपीएमची तरतूद नाही. राष्ट्रीय महामार्गांसाठीही एमपीएमपद्धत 

अंमलात आणली जात नाही. मात्र, महाराष्ट्रात अशाप्रकारे एमपीएम करण्याची पद्धत आहे. पण, ही पद्धत हातफोडीच्या खडीच्यावेळी योग्य होती. कारण हातफोडीची खडी वापरताना डांबर टाकून नंतर ती खड़ी वापरल्यानंतर इंटरलॉक होत असे. आता क्रशरखडी वापरली जाते. ती खड़ी त्याप्रकारे इंटरलॉक होत नाही. खडी योग्य प्रमाणात इंटरलॉक न झाल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. रस्त्याची लेव्हल बिघडते व त्यातून रस्त्यावर पाणी साचून खड्डे तयार होतात.


रस्ते अधिक टिकावू होतील याउलट बीएमची खडी ही डांबरमिक्सच असते. त्यामुळे या खडीच्या अतिशय चांगल्या पद्धतीने मिक्सिंग व इंटरलॉक झालेले असते. परिणामी ते एमपीएमपेक्षाही अधिक चांगले टिकावू राहते. अशा रस्त्यांना खड्डे पडण्याचे प्रमाणाही कमी आहे. त्यामुळे एमपीएम ऐवजी बीएम करून डांबरीकरण करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यात गैर असे काहीच नाही. यातून रस्त्याची कामे अधिक टिकावू होतील. एमपीएम व बीएम कारपेटमधील कामाचा दर्जाही आपल्याला पुढील कालावधीत निश्चितच दिसून येईल, असेही सर्वगोड यांनी सांगितले. तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित

आपण कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करत नाहीत, त्याच पद्धतीत कामे वेळेत पूर्ण होण्यावरही आपला भर आहे. काही ठेकेदारांनी अनेक महिन्यांपर्यंत कामे अर्धवट ठेवलेली आहेत. अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याअंतर्गत या विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना एक वर्ष कालावधीसाठी निलंबित केला आहे. काही ठेकेदारांनी कामे घेऊन अर्धवट ठेवलेली आहेत. ही कामे ते पूर्ण करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नवीन निविदा काढताना अशा अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदाच ओपन न करण्याबाबतची अट घालणार असल्याचेही सर्वगोड यांनी स्पष्ट केले.