देवगड महाविद्यालयात रक्तदान शिबिर...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 14, 2024 14:16 PM
views 143  views

देवगड : देवगड येथील श्री स. ह. केळकर शिक्षण विकास मंडळ संचालित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने

मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन व १५ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या स्तुत्य उपक्रमाचे औचित्य साधून या शिबिराचे देवगड कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत देवगड-जामसंडे शहर तथा तालुक्यातील नामांकित व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतला होता.सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे सचिव मा. प्रकाशजी जाधव यांनी रक्तदानाचे महत्व आणि उपयोग विद्यार्थांना समजावून सांगीतले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य, प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी, रक्तदान करतांना तसेच गरजूला रक्त देत असताना कोणतीही जात, धर्म पंथ पाळला जात नाही त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ठरते असे उद्बोधन करून उपस्थित विद्यार्थांना रक्तदानासाठी प्रोत्साहन दिले. सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडत असताना सामजिक भान जपणे आवश्यक असते.

त्यासाठी विद्यार्थी अश्या प्रकाराच्या शिबिरातून अत्यंत उच्च कोटीची समाजसेवा करू शकतात असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुमार कुनुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. २१ व्या शतकात संपूर्ण जग भर आपल्या कल्पना शक्तीच्या आवाक्या बाहेरची तांत्रिक प्रगती झाली आहे परंतु अजूनही मानवी अवयव तसेच रक्त निर्मिती करणे कोणत्याही तंत्रज्ञानाला शक्य झाले नाही. दुसरीकडे दररोज नव नवीन व्याधींचा उदय होत आहे त्यासाठी रक्ताची मागणी वाढत आहे अश्या पार्श्वभूमीवर देशातील तरुण निरोगी असणे आवश्यक आहे. रक्तदानाच्या माध्यमातून आपल्याला निरोगी जीवनाचा मंत्र अवगत होऊ शकतो. त्याशिवाय आपल्या हातून निस्वार्थ समाजसेवा आपोआपच घडते असे मत एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश वानखडे यांनी आपल्या प्रास्तविकात मांडले. या प्रसंगी मा. वीरेंद्र जोईल (६१), मा. रविकांत चान्दोस्कर यांनी (३५), मा. वैभव वारीक (२६) वेळा यांनी रक्तदान करून समाज सेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याप्रंसगी अश्या उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. शिवाय रक्तदानाचा विक्रम प्रस्थापित केलेल्या रक्त दात्यांना सन्मानित करण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे. या शिबिरासाठी सिंधुदुर्ग रक्त मित्र प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे जिल्हा समन्वयक मा. उद्धव गोरे, जिल्हा सदस्य मा. जोशी, तालुका सचिव मा. प्रकाश जाधव, मा. रविकांत चान्दोस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले तर सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी च्या वतीने डॉ. संकेत रोटे, सौ. प्रांजली परब, नेहा परब, जोसेफ पिंटो, साई सावंत, मिलिंद कांबळे व अस्लम शेख यांनी तांत्रिक सहाय्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एन. एस. एस. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन दहीबावकर यांनी केले तसेच एन. एस. एस. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अभिषेक मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. एस. चे सर्व स्वयंसेवकांचे बहुमोल सहकार्य लाभले.हे महा रक्तदान शिबिर यशस्वी केले त्याबद्दल शिक्षण विकास मंडळाचे सर्व मा. पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उप-प्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी संयोजकांचे कौतुक करून प्रोत्साहित केले व या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्त दात्यांचे एन. एस. एस., संस्था, महाविद्यालय प्रशासन, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान तथा सिंधुदुर्ग जिल्हा रक्त पेढी च्या वतीने आभार मानण्यात आले .