
सावंतवाडी : ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि मायकल डिसोझा मित्रमंडळ, आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोलीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात एकूण सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यामध्ये विशेष म्हणजे आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी रक्तदान करुन जनतेसमोर एक सुंदर आदर्श घालून दिला. त्याचबरोबर काही महिला आणि विशीतील तरुणांनीही रक्तदान केले. कोल्हापूरमधील वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरच्या रक्तपेढी टीमने रक्तसंकलन केले. यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. सारिका गावडे, ऑन कॉल रक्तदाता संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, रेस्क्यू टीमलीडर तथा संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते मायकल डिसोझा, पत्रकार विजय राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर तसेच आंबोली ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
ऑन कॉल रक्तदाते संस्था,सिंधुदुर्ग ही चांगले कार्य करत आहे. या संस्थेला सर्वांनीच हातभार लावावा, भविष्यात ही संस्था निश्चितच फार मोठे यश संपादन करेल एवढे त्यांचे कार्य चांगले आहे, अशा शब्दात उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे कधीही रक्ताची तातडीची गरज लागली तर ऑन कॉल रक्तदाते संस्थेला हाक मारा. ताबडतोब रक्ताची गरज ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास मायकल डिसोझा यांनी उपस्थित ग्रामस्थांना व रक्तदात्यांना दिला. हे रक्तदान शिबीर उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी आपल्या संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते मायकल डिसोझा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यामध्ये विशेष करुन राजू राऊळ, नारायण चव्हाण, अभय गावडे, सोनु गावडे, सतीश कोरगावकर, उत्तम नार्वेकर, झहीर शेख, पार्थ भिसे, सेल्विन गोन्साल्वीस, राहुल चव्हाण, परेश कर्पे, विशाल बांदेकर, रमेश मोहिते, मनेश नार्वेकर, रामचंद्र गावडे, संदेश राऊत, भूषण जोशी, मंदार जाधव इत्यादिंनी रक्तदानही केले व रक्तदान शिबिराचे उत्तम नियोजनही केले. रक्तदान शिबीर उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे उत्तम सहकार्य लाभले.