विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरची सुटका

Edited by:
Published on: March 24, 2026 10:56 AM
views 67  views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मौजे कोळंबे येथे आंबा कलम बागेतील विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरची वनविभागाने ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी सुटका केली. ही घटना दि. २१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

दिनेश अनंत भागवत यांच्या मालकीच्या गट क्रमांक १८४७१०/अ-१ मधील कठडा नसलेल्या विहिरीत सुमारे १२ फूट व्यास व ३५ ते ४० फूट खोल विहिरीत पाण्याच्या सुमारे ५ फूट पातळीत ब्लॅक पँथर वासराच्या भक्ष्यासह पडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीतील कपारीत बसलेल्या ब्लॅक पँथरला बाहेर काढण्यासाठी पिंजऱ्याच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, सुरुवातीला ब्लॅक पँथर पिंजऱ्यात येण्यास तयार नव्हता. दरम्यान, परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पावस पोलिसांनी नियंत्रण ठेवले. सलग प्रयत्नांनंतरही बिबट्या बाहेर न आल्याने दि. २२ मार्च रोजी पाण्याची पातळी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडण्यात आले. पाण्याची पातळी वाढताच ब्लॅक पँथर हालचाल करू लागला आणि अखेर पिंजऱ्यात अडकला. सुमारे ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर ही सुटका यशस्वी ठरली.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, सुमारे तीन वर्षांचा नर ब्लॅक पँथर पूर्णतः जखमी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याला खाद्य देऊन त्याच दिवशी रात्री नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. या मोहिमेत वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल न्हानु गावडे, जयराम बावधाने, धुळू कोळेकर, वनरक्षक विराज संसारे यांच्यासह वनकर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, पोलिस व होमगार्ड यांचे सहकार्य लाभले. या कार्यासाठी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वन संरक्षक प्रियंका लगड यांचे मार्गदर्शन लाभले. संकटात सापडलेल्या वन्य प्राण्यांची माहिती तात्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.