
सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'फार्मसी क्षेत्रातील रहस्यांचा उलगडा : इन्साईट्स फ्रॉम लॅब टू इम्पॅक्टफुल रिसर्च' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद शनिवारी भोसले नॉलेज सिटी येथे संपन्न झाली. फार्मसी क्षेत्रातील संशोधन आणि इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञान याविषयीची चर्चा या परिषदेत करण्यात आली.
परिषदेसाठी तज्ज्ञ वक्त्या म्हणून गोवा येथील सेंटॉर फार्मास्युटिकल्सच्या फॅक्टरी मॅनेजर सुषमा नाईक उपस्थित होत्या. सोबतच कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, कराड येथील फार्मास्युटीक्स विभागाचे प्रमुख डॉ. अमोल शेटे आणि गोवा येथील बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.डॉ.मांगिरीश देशपांडे उपस्थित होते. परिषदेचे उदघाटन कॉलेजचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सोबतच डिजिटल स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. रमण बाणे, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, समन्वयक प्रा.मयुरेश रेडकर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ.जगताप म्हणाले की कॉलेजने गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले आहे. ही सातवी परिषद असून विद्यार्थ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान व्हावे आणि त्यांच्या गुणवत्तेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळावे हाच आयोजनाचा हेतू आहे. सुषमा नाईक यांनी फार्मा इंडस्ट्रीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेले बदल, नियामक प्राधिकरणाच्या अटी-शर्ती तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा रोजगार निर्मितीवर होणारा प्रभाव याविषयी भाष्य केले. अच्युत सावंतभोसले यांनी परिषदेला शुभेच्छा देताना संस्था नवीन संशोधन आणि इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले.
परिषदेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथून अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले. एकूण तीन सत्रात ही परिषद संपन्न झाली. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी धारकांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजनसुद्धा करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शैक्षणिक परिषदेत व्याख्याने, चर्चासत्रे, आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडली. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रा.मयुरेश रेडकर, प्रा.तुषार रुकारी, प्रा.नमिता नार्वेकर, डॉ.रोहन बारसे व प्रा. गायत्री आठलेकर यांच्या टीमने केले. सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले यांनी केले.